छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके आणि एका पोलीस अधिकाऱ्यामध्ये शुक्रवारी (दि.७) बजाजनगर येथे तीव्र शाब्दिक चकमक उडाली. आपल्या निवासस्थानी भेटण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना पोलिसांकडून अडवून उद्धट वागणूक दिली जात असल्याचा आरोप करत दिपके यांनी संबंधित अधिकाऱ्यावर जोरदार संताप व्यक्त केला. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
दिपके यांच्या निवासस्थानी दररोज नागरिकांची गर्दी होत असल्याने सुरक्षेच्या
कारणास्तव पोलिसांनी तिथे बंदोबस्त तैनात केला आहे.
मात्र, पोलिसांच्या या हस्तक्षेपावर दिपके यांनी तीव्र आक्षेप घेतला. कुणाला भेटायचे आणि कुणाला नाही, हे मी
ठरवणार, पोलीस नाही! अशा आक्रमक शब्दांत त्यांनी अधिकाऱ्याला सुनावले. तसेच तुम्ही कोणत्या विभागाचे आहात ? तुमचे पद काय? अशी विचारणा करत त्यांनी अधिकाऱ्याचे नाव नोंदवून घेतले आणि पोलिसांना थेट घराबाहेर जाण्याचा इशारा दिला. या संपूर्ण प्रकारानंतर दिपके यांनी संबंधित उपायुक्तांकडे (डीसीपी) दूरध्वनीवरून तक्रार दाखल केल्याचे समजते. दुसरीकडे, मी माझी दिलेली ड्यूटी बजावत होतो, असे स्पष्टीकरण संबंधित पोलीस अधिकाऱ्याने दिले आहे. या वादामुळे बजाजनगर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions












